गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

तालविचार

तालविचार :
 संगीतशास्त्रात तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे आणि महत्त्वपूर्ण आहे. ‘तालः कालक्रियामानम्’ याचा अर्थ ‘ताल’ म्हणजे काळाची गती मोजण्याचे परिमाण. ‘ताल’ ह्या शब्दांचे मूळ रूप ‘तल’ असावे. तल म्हणजे तळवा. एका तळव्याच्या दुसऱ्या तळव्यावर अथवा दुसऱ्या वस्तूवर–वाद्यावर होणाऱ्या आघातास ‘ताल’ म्हणतात. संगीताच्या संदर्भात सांगावयाचे झाल्यास अशा प्रकारे ताल देऊन कालप्रवाहाचे भिन्न भिन्न खंड पाडले जातात. ‘तल’ ह्याचा अर्थ ‘पाया’ असाही होतो. म्हणजेच कालमापनाचा पाया ह्या अर्थाने. ‘ताल’ ह्या शब्दावरूनच ‘ताली’ हा हिंदी आणि ‘टाळी’ हा मराठी शब्द प्रचारात आलेला आहे. लयबद्ध कालप्रवाहाच्या मापनाची विशिष्ट व सुसंगत रचना म्हणजेच ‘ताल’. संगीताच्या संदर्भात तालाची व्याख्या करावयाची झाल्यास, ताल म्हणजे ‘ऱ्हस्वदीर्घदिकांनी युक्त अशा सशब्द किंवा आघातयुक्त अथवा निःशब्द किंवा अनाघात क्रियेद्वारा संगीतरचनांचा काळ मोजणारा घटक’, अशी करता येईल.



मात्रा :
 काळ किंवा कालस्तर मोजण्याचे परिमाण म्हणजे ‘मात्रा’ ‘मा’ हा संस्कृत शब्द मोजण्याची क्रिया दाखवितो. त्याचप्रमाणे ‘मीटर’ हा लॅटिन भाषेतून इंग्रजीत रूढ झालेला शब्दसुद्धा मोजण्याचीच क्रिया दर्शवितो. ‘ताल’ हे काळ मोजण्याचे परिमाण, तर ‘मात्रा’ हे ताल मोजण्याचे परिमाण. ह्या दोन्ही संज्ञांचे कार्य मोजणे हेच असले, तरी दोन टाळ्यांमधील अंतर मोजण्यासाठी  ‘मात्रा’ हे परिमाण वापरले जाते. हे परिमाण अतिशय लहान असून सर्वसाधारणपणे एका सेकंदाचे मानले जाते. जुन्या शास्त्रकारांच्या मते डोळ्यांच्या पापणीच्या एका उघडझापेएवढा अवधी एका मात्रेचा असतो. फार्सी विद्वान मात्रेचे प्रमाण मनगटाच्या नाडीच्या एका ठोक्याएवढे मानतात. प्राचीन तालशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाच लघू अक्षरांच्या शब्दास मात्रा म्हणतात. ‘अणू’, ‘रेणू’ व ‘परमाणू’ ह्या सूक्ष्म मात्रा आहेत, परंतु संगीतात ‘अणुद्रुत’, ‘द्रुत’, ‘लघु’, ‘गुरु’ व ‘प्लुत’ ह्या पाच मात्रा प्रचलित आहेत.



ताल आणि मात्रा यांचा लयीशी आलेला संबंध :
 संगीतक्षेत्रात सर्वसाधारणतः काळाच्या गतीला ‘लय’ म्हणून संबोधले जाते. त्याचप्रमाणे मात्रेच्या परिमाणाने लयीचे मोजमाप केले जाते. मात्रेचे, म्हणजेच एका मात्रेच्या वेळाचे, प्रमाण व्यवहारात लहानमोठे करता येते. एकाहून अनेक मात्रांच्या समूहाचा ताल निर्माण होतो. तालरचनेत मात्रांच्या लहानलहान समूहाचे विभाग पाडलेले असतात व प्रत्येक विभागाच्या पहिल्या मात्रेवर टाळी अथवा ‘खाली’ पडते (खाली ह्या शब्दास ‘काल’ असेही म्हणतात). ‘खाली’ वर हात नेहमी खालच्या बाजूस केला जातो. अर्थात ही क्रिया तळव्यांनी ताल मोजतांनाच शक्य होते. वाजवतेवेळी  खालीच्या जागी बिनजोरकस नाद निर्माण केले जातात. तालाच्या पहिल्या मात्रेस ‘सम’ ही संज्ञा असून ह्या जागी जोरकस नाद निर्माण करणे इष्ट असते.



आवर्तन :
आवर्तनाचा शब्दशः अर्थ म्हणजे फेरा. विशिष्ट कालखंडाच्या नियमितपणे पुन्हा पुन्हा होणाऱ्या चक्रात्मक गतीस आवर्तन म्हणता येईल. तालाच्या आरंभावर वा मध्यावर विशिष्ट आघात देऊन सुचविलेला व याच नियमानुसार पुनरावर्तित होणारा कालखंड म्हणजे आवर्तन. हा चक्रासारखा मानला गेला असण्याचे कारण असे की, चक्र ज्यावेळेस फिरते त्यावेळी विशिष्ट जागी त्याच्या परिघावरील विशिष्ट बिंदू येतो तेव्हा त्याचा फेरा पूर्ण होतो. फेरा जेथून सुरू होतो तेथे परत आल्याखेरीज तो पूर्ण होत नाही. ह्या फेऱ्याच्या आरंभबिंदूपासून त्याचे चक्राकार फिरून पुन्हा आरंभबिंदूपर्यंत येण्यास लागणारा कालावधी त्याच्या चक्राकार गतीवर अवलंबून असतो. आवर्तनात प्रारंभाची व मध्यावरील जागा अनुक्रमे आघाताने व बिनआघाताने स्पष्ट केली जाते. जेव्हा हा आघात पुन्हा येतो, तेव्हा दुसऱ्यांदा सुरुवात किंवा मध्य आल्याची सूचना मिळते. ह्या प्रारंभाला तालशास्त्रात ‘सम‘ असे म्हणतात. त्याप्रमाणेच मध्याला ‘काल‘ असे नाव आहे. एखादा ताल अतिशय कमी मात्रांचा असल्यास त्याच्या आवर्तनात ‘सम’ अथवा ‘काल’ ह्यांपैकी एकच बिंदू देण्यात आलेला असतो. ह्याउलट तालाच्या मात्रा जेवढ्या अनेक किंवा त्याच्या खंडांची रचना जेवढी वैशिष्ट्यपूर्ण तितके विराम व अर्धविराम त्यात अंतर्भूत करण्याची गरज भासते. ह्या गोष्टी कालाच्या किंवा ‘खाली’च्या बिनआघातांच्या  व भरीच्या आघातांच्या बोलांनी स्पष्ट करण्यात आलेल्या असतात. जर प्रारंभ आघातयुक्त असेल, तर मध्य आघातयुक्त असू शकणार नाही. उलट मध्य आघातयुक्त असेल, तर प्रारंभ अनाघातच असला पाहिजे. म्हणजेच अशा वेळेस प्रारंभीचा बोल तारध्वनीयुक्त (ट्रेबल) अथवा कमी जोरकस (लाईटली स्ट्रेस्ड) असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष वादनात एकापेक्षा अधिक आवर्तने असल्यास पहिल्या आवर्तनाचा शेवट हाच पुढील आवर्तनाचा आरंभ असतो. ह्याच कारणासाठी ‘सम’ ही आवर्तनाचा आरंभबिंदू व अंत्यबिंदू अशी दोन्ही कामे एकाच वेळी करते. कालाखेरीज (मध्यबिंदूखेरीज) आवर्तनाची कल्पना सिद्ध होऊ शकत नाही. कारण एकच आवर्तन असले तर ते संपूर्ण आहे, हे दर्शविण्यासाठी त्याचे दोन समान भाग करून दाखवावे लागतात. तालावर्तनाच्या चक्रात्मक व पुनरावर्तनात्मक वैशिष्ट्यांच्या स्पष्टतेसाठी विविध तालांमधील मात्रांसाठी योजिलेले बोल महत्त्वाचे असतात.
तालाचे दशप्राण :
काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती आणि प्रस्तार हे तालाचे दशप्राण मानले गेलेले आहेत.
(१) काल :
‘कलनात् सर्वभूतानां सकलः परिकीर्तितः’ सर्व भूतमात्राची गणना करणारा म्हणजे काल. ऋषींनी क्षणापासून कल्पांतापर्यंत कालाची जी मोजणी केली, त्यातून संगीतशास्त्रात आठ काल घेतले गेले आहेत. कालांची नावे व त्यांच्या सेकंदांमध्ये दिलेल्या मात्रा : त्रुटी १/८, अणुद्रुत १/४, द्रुत १/२, लघू १, गुरू २, काकपद ४, हंसपद ८ आणि महाहंसपद १६. कालस्तर अथवा कालप्रवाहाचा पाया नेहमी ताल अथवा मात्रांसारख्या परिमाणांनी मोजला जातो. तालावर्तनाचा वेळ, एकंदर रचनेच्या प्रारंभापासून पूर्ततेपर्यंतचा वेळ. तालांमधील खंडातील या विभागांमधील अंतर ह्या सर्व गोष्टी ‘काल’ ह्या संज्ञेत अंतर्भूत झालेल्या आहेत.
(२) मार्ग :
तालरचनेचा शेवट गाठण्यासाठी अत्यावश्यक अशा वैशिष्ट्यांमधून जाणारी वाट. मात्रेच्या काळाचे प्रमाण, तालरचनेतील खंड किंवा विभाग, उपविभाग तिच्यातील विशिष्ट मात्रांवरील नियोजित अक्षराचा अथवा बोलाच्या आघाताचा जोरकसपणा किंवा बिनजोरकसपणा या गोष्टींचे प्रमाण म्हणजेच ‘मार्ग’. भरतमुनींनी ‘चित्र’, ‘वार्तिक’ व ‘दक्षिण’ हे मार्ग वर्णिलेले आहेत, तर शार्ङ्‌गदेवाने ‘ध्रुव’ नामक आणखी एका मार्गाची त्यात भर घातलेली आहे. चित्र, वार्तिक व दक्षिण ह्या मार्गांमध्ये अनुक्रमे १० लघू अक्षरांच्या उच्चारणामुळे निर्माण झालेल्या काळाची गती ‘द्रुत’ म्हटली आहे. २० लघू अक्षरांच्या उच्यारणामुळे झालेली गती ‘मध्य’ व ४० लघू अक्षरांच्या उच्यारणामुळे झालेली गती ‘विलंबित’ म्हटली आहे. आजच्या संगीतात मात्र हे प्रमाण कमी झालेले आढळते. आजची विलंबित गती १० लघू अक्षरोच्चारणाची, मध्य गती ५ लघू अक्षरोच्चारणाची, तर द्रुत गती २ किंवा ३ लघू अक्षरोच्चारणांची झालेली  आहे.
(३) क्रिया :
हातांनी ताल देतेवेळी बोटांच्या व तळव्यांच्या ज्या हालचाली होतात, त्यांना ‘क्रिया’ ही संज्ञा आहे. क्रियेचे दोन मुख्य प्रकार आहेत : एक ‘सशब्द’ म्हणजे आवाज करणारी, तर दुसरी ‘निःशब्द’ म्हणजे आवाज न करणारी. निःशब्द व सशब्द क्रियांचे प्रत्येकी चार उपप्रकार आहेत. निःशब्द क्रियेचे प्रकार : आवाप, निष्काम, विक्षेप व प्रवेश हे होत; तर सशब्द क्रियेचे प्रकार ध्रुव, शंपा, ताल व सन्निपात हे होत.
निःशब्द क्रिया : (१) आवाप : वर उचलल्या जाणाऱ्या उजव्या हाताची बोटे जुळवून ठेवण्याची क्रिया. (२) निष्काम : खाली ठेवलेल्या (उताण्या) डाव्या हाताची बोटे फैलावण्याची, मोकळी करण्याची क्रिया. (३) विक्षेप : वर उचलला जाणारा उजवा हात (टाळी मारण्यापूर्वी) स्वतःच्या उजव्या बाजूस पाठीकडे नेण्याची क्रिया. (४) प्रवेशः खाली ठेवलेल्या डाव्या हाताची बोटे जुळवून वरच्या हाताच्या त्याच्यावर होणाऱ्या आगमनाची–प्रवेशाची–तयारी ठेवण्याची क्रिया.
सशब्द क्रिया : (१) ध्रुव : चुटकी वाजवत उजवा हात खाली  आणण्याची क्रिया. (२) शंपा : उजव्या हाताने टाळी देण्याची क्रिया. (३) ताल : डाव्या हाताने टाळी वाजवण्याची क्रिया. (४) सन्निपात : दोन्ही हातांनी टाळी वाजवण्याची क्रिया.
(४) अंग :
तालाच्या विभागांना ‘अंग’ ही संज्ञा आहे. निरनिराळ्या तालांचे विभाग निरनिराळ्या प्रकारांनी पाडलेले असतात. अंगांची नावे कालांच्या नावाप्रमाणेच असून सहा मुख्य अंगे तालशास्त्रात मानलेली आहेत. त्यांचा काळ अक्षरोच्चारणाप्रमाणे आहे. त्यांची चिन्हेसुद्धा निश्चित केली गेलेली असून ती अशी आहेत :
(५) ग्रह :
तालामध्ये ‘सम’ आणि ‘विषम’ असे दोन मुख्य ग्रह मानलेले आहेत. ह्या दोन्ही तालावर्तनातील विशिष्ट जागा आहेत. संगीताच्या कालस्तराच्या संगतीमध्ये होणाऱ्या तालाच्या प्रारंभीच्या जागेस ‘समपाणि’ अथवा ‘समग्रह’ म्हणतात. तसेच संगीताच्या कालस्तरातील संगतीत संगीताच्या आवर्तनाच्या सुरुवातीनंतर तालावर्तनाची सुरुवात झाल्यास त्यास ‘विषम ग्रह’ म्हणतात. विषम ग्रहाचे ‘अतीत’ किंवा ‘अवपाणि’ व ‘अनागत’ असे दोन प्रकार आहेत.
(६) जाती :
तालरचनेतील विभागांच्या मात्रांची संख्या बदलल्यामुळे तालाचे वजन बदलते व त्यामुळे त्यांच्या विविध प्रकारच्या जाती बनतात. तालखंडामधील मात्रांची संख्या कमीअधिक केल्यामुळे त्यांच्या चलनात–गतीत–जे अंतर पडते, ते अंतर म्हणजेच ‘जाती’. लघू अक्षरोच्चारणांच्या मात्रा बदलल्यामुळे पाच जाती बनतात : चतस्‍र, तिस्‍र, मिश्र, खंड व संकीर्ण. ह्यांत अनुक्रमे ४, ३, ७, ५ व ९ अशा लघू अक्षरोच्चारणांच्या मात्रा मोडतात.
(१) चतस्‍र जाती : ज्या तालांच्या एकूण मात्रा २, ४, ८, १६ अशा संख्यांनी विभागल्या जातात, त्या तालांची जाती चतस्‍र असते. त्रितालासारखे ताल चतस्‍र जातीत मोडतात.
(२) तिस्‍र जाती : ज्या तालांच्या एकूण मात्रा १।।, ३, ६ अशा संख्यांनी विभागल्या जातात, त्या तालांची जाती तिस्‍र असते. दादरा, एकताल, चौताल यांसारखे ताल ह्या जातीत येतात.
(३) मिश्र जाती : चतस्‍र व तिस्‍र जातींचे मिश्रण असल्यामुळे ह्या जातीस ‘मिश्र’ ही संज्ञा पडली. ज्या तालांच्या  एकूण मात्रा १।।।, ३।।, ७, १४, २८ अशा संख्यांनी विभागल्या जातात, त्यांना मिश्र जातीचे ताल म्हणतात. आडाचौताल, रूपक, धमार यांसारखे ताल ह्या जातीत मोडतात.
(४) खंड जाती : तालांच्या एकूण मात्रांना १।, २।।, ५, १० अशा संख्यांनी भाग जात असेल, तर त्या तालांची जाती खंड जाती म्हणून ओळखली जाते. उदा., झपताल, शूलताल.
    अंग
    चिन्ह
    अक्षरसंख्या

    अणुद्रुत
      ⌣
        १

    द्रुत
      o
        २

    लघु-
      ।
        ४

    गुरु-
      S
        ८

    प्लुत
      ३
        १२

    काकपद
      +
        १६
(५) संकीर्ण जाती : ज्या तालांच्या एकूण मात्रा २।, ४।।, ९ अशा संख्यांनी विभागल्या जातात, त्या तालांची जाती संकीर्ण म्हणून ओळखली जाते. उदा., मत्तताल, लक्ष्मीताल इत्यादी.
(७) कला :
तालवाद्य वाजवितेवेळी हाता–बोटांची ठेवण, फैलावणे, हालचाल वगैरे गोष्टी कशा सौंदर्यपूर्ण असाव्यात, ह्यांचे वर्णन आठ कलांमध्ये केलेले आहे. वक्रा, कृष्णा, सर्पिणी, पद्मिनी, अपताका, कम्पना, देवसम्भवा व विसर्जिनी ह्या त्या आठ कला होत.

(८) लय :
तालशास्त्रात काळाच्या (कालस्तराच्या) कुठल्याही भागाच्या समान चालीला (गतीला) लय म्हटले आहे वा एका क्रियेपासून दुसरी क्रिया सुरू करेपर्यंतची जी विश्रांती आहे, ती म्हणजे लय.सध्या लयीचे चार प्रकार प्रचारात आहेत : (१) विलंबित लय : साधारण आठ लघू अक्षरांचे अंतर प्रत्येकी दोन मात्रांमध्ये असेल, तर ती विलंबित अथवा धीमी लय समजली जाईल. (२) मध्य लय : विलंबित लयीची दुप्पट म्हणजे मध्य लय. म्हणजेच प्रत्येकी दोन मात्रांमधील अंतर विलंबित लयीच्या मात्रांमधील अंतराच्या निमपट होईल. ते ४ लघू अक्षरांचे होईल. (३) द्रुत लय : मध्य लयीची दुप्पट म्हणजे द्रुत लय. (४) अणुद्रुत लय: ह्याच्यप्रमाणे द्रुत लयीची दुप्पट म्हणजे अणुद्रुत लय होईल. लयीचे पुढील तीन प्रकारही प्रचारात आहेत. कुवाडी लय : मध्य लयीची सव्वापट. आडी लय : मध्य लयीची दीडपट. बियाडी लय : मध्य लयीची पावणेदोनपट.
(९) यती :
लयीच्या वृत्तीस ‘यति’ ही संज्ञा आहे. तालांच्या बंदिशांमध्ये विविध प्रकारच्या जाती वापरून किंवा समान मात्रांमध्ये कमीअधिक संख्यांची अक्षरे वापरून विविध प्रकारच्या गती दर्शविण्यात येतात. लय किंवा कालस्तराचा वेग एकच राहिलेला असल्यामुळे एका विशिष्ट चालीचा किंवा गतीचा भास निर्माण केला जातो. समा, स्रोतोगता, गोपुच्छा, मृदंगा व पिपीलिका अशा पाच यती तालशास्त्रात वर्णिलेल्या आहेत.
(१०) प्रस्तार :
वादनातील बंदिशांचा तालखंडांना अनुसरून होणारा विस्तार म्हणजेच प्रस्तार होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again