गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

तबला


♻️ तबल्याविषयीची माहिती ♻️


सदरील माहिती हि गुरु. श्री. सुनीलजी शेलार सर यांनी संग्रहित करून उपलब्ध करून दिली आहे. 



हिंदुस्थानी म्हणजे उत्तर भारतीय संगीतात साथसंगतीसाठी व स्वतंत्र वादनासाठी वापरल्या जाणाऱ्या एका अवनद्ध तालवाद्याची जोडी. उजव्या हाताने वाजवितात तो तबला किंवा ‘दायाँ’ व डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा अथवा ‘बायाँ’. डग्ग्याचा उपयोग खर्ज ध्वनी काढण्यासाठी; तर तबल्याचा उच्च ध्वनी काढण्यासाठी करतात.

तबला ह्या वाद्याचे मूळ ‘तब्ल’ या अरबी वाद्यात असावे. इब्न खुर्दाद बिह ह्या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक ह्या अरबी कलावंताकडे जातो. हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले. १२९६ ते १३१६ च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन ख्याल व टप्प्यासारख्या संगीतरचनांबरोबर त्याचा साथीसाठी वापर होऊ लागला. मृदंग-पखावजाप्रमाणे उपयोगात आणलेली ‘शाई’ ही महत्त्वाची सुधारणा. ह्याचे श्रेय बहुमताने अमीर खुसरौस (१२५३–१३२५) दिले जाते.

तबला खैर, शिसव, बाभूळ, चिंच इत्यादींच्या लाकडाचा बनविलेला असून तो वरील तोंडाकडे किंचित निमूळता, नळकांड्याच्या आकाराचा व आतून पोखरून काढलेला असतो. डग्गा तांब्याचा, पितळेचा किंवा क्वचित मातीचा असून घुमटाकृती असतो. डग्ग्याचा रुंद व तबल्याच्या निरुंद तोंडावर बकऱ्याचे चामडे ताणून बसविलेले असते. हे चामडे, त्याभोवतालची दुहेरी किनार (चाट), वर बसविलेली वादीची विणलेली कडा (गजरा) ह्या सर्वांना मिळून ‘पुडी’ म्हणतात. नादमाधुर्यासाठी तबल्याच्या पुडीच्या मध्यावर व डग्ग्याच्या पुडीवर मध्याच्या जरा बाजूस ‘शाई’ (लोखंडाचा कीस, काळी शाई व भात यांचे मिश्रण) घोटून वर्तुळाकार थर देतात. पुडीमधून ओवलेली वादी तळाच्या चामडी कड्यातून (‘पेंदी’मधून) तोंडाभोवती ओढून घेतात. तबल्याच्या वादीतील लाकडी गठ्ठे खालीवर ठोकून गायन-वादनाच्या आधारस्वराशी त्याचा स्वर जुळवितात.

भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्रीतबल्याच्या उत्पत्ती विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे दिसून येते. काही लोक तबल्याचा जनक म्हणून अमिर खुस्रोकडे पाहतात. पखवाजाचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही आहे.

वादनवैशिष्ट्यांनुसार तबल्याची विविध घराणी निश्चित झाली आहेत. ‘दिल्ली’ हे आद्य घराणे. ‘बंद बाज’ व ‘खुला बाज’ ह्या या घराण्याच्या मूळ संकल्पना होत. बंद बाज वा ‘चाँटी का बाज’ या प्रकारात चाटेवरील व शाईवरील आघात स्वतंत्र बोटांनी करतात. ‘दिल्ली’, ‘अजराडा’, ‘बनारस’ ही या प्रकारातील घराणी होत. खुला बाज अथवा ‘पूरब बाज’ (दिल्लीच्या पूर्वेकडील घराणी) या प्रकारात चाट व शाई यांच्या मधील भागावर (‘लवे’वर) पंज्यांनी अथवा बोटे जुळवून आघात केला जातो. त्यावर पखावजाच्या वादनपद्धतीची छाप दिसते. जोरकसपणा हे वैशिष्ट्य, ‘लखनौ’, ‘फरूखाबाद’, ‘मेरठ’, व ‘पंजाब’ ही या प्रकारातील घराणी होत.

दिल्ली घराण्याचे उस्ताद नथ्थूखाँ, गामेखाँ, अजराड्याचे उस्ताद हबीब उद्दिनखाँ, लखनौचे वाजिद हुसेनखाँ, फरूखाबादचे उस्ताद मुनीरखाँ, ⇨ अहमदजान थिरकवा, अमीर हुसेनखाँ, बनारसचे पंडित राम सहाय, बिरू मिश्र, पं. सामताप्रसाद मिश्र, पंजाबचे उस्ताद कादिर बक्ष असे काही प्रसिद्ध तबलावादक होत.

लयप्रधान गायकी, वादन व कथ्थकसारखी नृत्ये ह्यांस तबल्याच्या संगतीने रंगत येते.
〰〰〰〰〰〰〰〰〰

♻️ तबला ♻️


गल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. खैराचे वा शिसवी लाकूड यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास पुडी असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास चाट (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास लव किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध शाई लावण्यात येते. तबल्याची पट्टी (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे संवादिनी /बाजाच्या पेटीचा वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरूनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या काळी चार शी सम-स्वरात असलेला तबला काळी चारचा तबला म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर लावला तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी गठ्ठे (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा टीपेकडे जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे गजरा होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या वाद्या गजर्‍यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस गुडरी म्हणतात. वाद्या वरच्या अंगाला गजर्‍यात तर खालच्या अंगाला गुडरीतून ओवलेल्या असतात.

♻️ डग्गा ♻️


प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची शाई तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याचे भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास डुग्गी म्हणतात.

तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास गादी, तबला/डग्गा सुरावर लावण्यास हातोडी व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी पावडर असा सरंजाम असतो.

♻️  घराणी ♻️

ख्याल गायकीत तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी पखवाज वगळता कोणताही उन्नत पर्याय उपलब्ध नाही.
वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात खालील घराण्यांचा समावेश होतो.

❇️ दिल्ली घराणे ❇️


दिल्लीच्या उस्ताद सिध्दारखाँ यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.

❇️ लखनौ ❇️


सिद्धारखाँ यांचे नातु मोदू व बक्षु या घराण्याचे प्रवर्तक होत. लखनौ भागात नृत्याचा प्रचार जास्त असल्याने त्यास अनुकल हा बाज जोरदार व खुला आहे. मोठे परण व तुकडे हे या बाजाचे आहे.

❇️ बनारस ❇️

मोदू खाँ यांचे शिष्य पं राम सहाय या घराण्याचे प्रवर्तक. बनारसचा बाज खुला व ठुमरी पोषक असे आहे.

❇️ पंजाब ❇️

पंजाबमधील तबलवादक हुसेनबक्ष हे या घराण्याचे मूळ प्रवर्तक. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन पंजाब घराण्याचे प्रतिनिधीत्व करतात. बंद प्रकारे बोल वाजवण्याची पंजाब घराण्याची खासियत आहे.

❇️ इंदुर ❇️

इंदूर दरबारचे प्रसिद्ध पखवाजवादक पं. नानासाहेब पानसे हे या घराण्याचे प्रवर्तक. पखवाजाचा या घराण्याच्या शैलीवर विशेष प्रभाव आहे.
✳️✳️✳️✳️या खेरीज फारुखाबाद, अजराडा आदि तबल्याची इतर घराणी आहेत.✳️✳️✳️✳️

सौजन्य:
मराठी विश्वकोश आणि विकिपेडीया .
संकलन🔺श्रीपाद विद्वत
〰〰〰〰〰〰〰